Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रावण गझलोत्सव

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
श्रावण गझलोत्सव
भाग पाचवा 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

🌹अंकाचे मानकरी 🌹

१) शिवाजी जवरे
२) संजय गोरडे
३) राज शेळके
४) सुरेश तायडे
५) गौतम राऊत 
६) दिलीप पाटील 
७) डॉ. सुभाष कटकदौंड
८) सतीश मालवे 
९) सरोज चौधरी 
१०) मीना महामुनी 
११) रेखा येळंबकर 
१२) शीला टाकळकर 
१३) डॉ. विजया नवले झरकर

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

१) शब्द आणले कुठून ते दाखवून जा

या काळोखी स्वप्नज्योत पेटवून जा
तुझिया ध्यानी सदा मला गुंतवून जा

कळे न केंव्हा झोपतील हे थकलेले
निघतांना तू मला जरा जागवून जा

जुनेच आकार कापुनी आणलेस तू
चातुर्याने चित्र नवे भासवून जा

कुंद कुंद हा आसमंत मरगळ सारी
वारा होऊन रान जरा चाळवून जा

फक्त आपुला पंथ खरा अन् कल्याणी
प्रलोभने वा फळे लोक बाटवून जा

प्रभूच आहे पोशिंदा ह्या जगताचा
जमेल तू लेकरे तशी वाढवून जा

उरात माझ्या जळे तेच बोललास तू
शब्द आणले कुठून ते दाखवून जा

शिवाजी जवरे

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

२) गझल बरसू न शकल्या श्रावणांची गोष्ट असते

दिल्या अन पाळल्या आश्वासनांची गोष्ट असते 
गझल हातून सुटलेल्या क्षणांची गोष्ट असते

कधी एका कधी दोघाजणांची गोष्ट असते 
गझल आतूरलेल्या तन-मनांची गोष्ट असते

कळत जातात अर्थांचे पदर ज्यांच्या उशीरा 
गझल 'त्या' आपल्या संभाषणांची गोष्ट असते

कुणी येऊन काही त्यातले बदलीत नसतो 
गझल आपुल्या अटळश्या प्राक्तनांची गोष्ट असते 

लिहीत नसतेच ती प्रत्येक श्वासाची कहाणी 
गझल ही मोजक्या आंदोलनांची गोष्ट असते 

व्यथा नसतेच ती बरसून गेलेल्या सरींची
गझल बरसू न शकल्या श्रावणांची गोष्ट असते

जिथे कित्येक स्वप्नांची जहाजे लुप्त झाली 
गझल असल्याच सागर लोचनांची गोष्ट असते 

संजय गोरडे 'सौभद्र'
नाशिक

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

३) गझले तुझ्यामुळे ही झाली दशा

झाल्या चुका कुणाच्या रागावले कुणी
कोणी निघून गेले... रेंगाळले कुणी!

होते कटात सामिल...घरचे बरेच पण 
कोणी कबूल केले...फेटाळले कुणी!

वेळेनुसार झाले सत्कार हे असे 
लाथाडले कुणी तर...कवटाळले कुणी!

होते बरेच अंतर चालायचे अजुन
कोणी थकून गेले...संथावले कुणी

गेले कळून अंती रुग्णास सत्य हे 
कोणास दुःख आहे...कंटाळले कुणी

गझले तुझ्यामुळे ही झाली दशा कशी
कोणी उजाड झाले...नादावले कुणी!!

राजेश्वर पांडुरंग शेळके
नाशिक.
मो. 9423542224

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


४) ती हसल्यावर...


जखमेवरची फुंकर ठरते, ती हसल्यावर
अन हृदयाचे दार उघडते, ती हसल्यावर

कधी फुलावे,कधी गळावे....भान हरपते
सहा ऋतूंना वेड लागते ,ती हसल्यावर

श्रावण जेव्हा आठवणींचा भरून येतो 
अंगाला एक सर बिलगते,ती हसल्यावर

उन्हात सर अन ,पावसात उन झळकत असते
अशी जादुची कांडी फिरते ,ती हसल्यावर

जगण्यासाठी असते धडपड , सुरू जिवाची
पण मरणाला मिठी मारते, ती हसल्यावर

सुरेश तायडे
मलकापूर

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀


५) पाऊस आणि तू

खरे मला जगण्याचे कारण पाऊस आणि तू
म्हणून म्हणतो माझा श्रावण पाऊस आणि तू

का बदलत नाही माझे म्हणणे वेळोवेळी
जपून आहे माझे मीपण, पाऊस आणि तू

ती भेट आपली कायम विसरू शकलो नाही
हीच खरेतर माझी अडचण पाऊस आणि तू

तुमच्यासाठी रोज कितीदा व्याकुळ झालेलो
मिटवुन घ्या ना तुमचे भांडण पाऊस आणि तू

मीच कुणाच्या वेशीवरती थबकत नाही जर
कसे भेदता माझे रिंगण पाऊस आणि तू

गौतम राऊत
ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर
मो. 8551886009

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

६) मिरवणूकही निघते अमुच्या पराभवाची

मी आधी, तू नंतर ही तर रीत जगाची आहे
कुठे कुणाला तमा कुणाच्या विश्वासाची आहे

हिंसा अन्यायाच्या घटना रोजच घडती येथे
कसे म्हणू ही धरा तथागत सिद्धार्थाची आहे

नको वल्गना व्यर्थ घोषणा महिला उत्थानाच्या
अजून जळते तीच खरी जी शान घराची आहे

येणारा तर खुशाल बघतो स्वप्ने शतजन्मांची
जरी जाणतो क्षणभंगुरता धड श्वासाची आहे

रोज आंधळ्या आनंदाच्या कथा सांगतो आम्ही
मिरवणूकही निघते अमुच्या पराभवाची आहे

नावापुरत्या स्वातंत्र्याने उगाच गदगद झालो
खरी मजा तर संधीसाधू अन् रावाची आहे

दिलीप सीताराम पाटील
राजूरा

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

७) पुरे वाद आता जुना आपला

पुरे वाद आता जुना आपला 
नसे फायदा ना तुला ना मला 

जरी शब्द ओठी मुका लाजला 
सखे भाव डोळ्यात मी वाचला 

ह्रदय चोरते ना खबर ना पता 
सखीला शिकवली कुणी ही कला 

तिला भावली वाट ती वेगळी 
जुना मार्ग मीही पुन्हा शोधला 

मनाचे जरा दार उघडेन पण 
कळाया हवे कोण आहे भला 

डॉ. सुभाष हरिबा कटकदौंड 
खोपोली, रायगड
मो. ९५६१२८४४०८

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

८) शब्द जेव्हा ढाल बनले आमचे

ती म्हणाली तेच घडले आमचे
आखलेले डाव फसले आमचे

शस्त्र होते की, नजर होती तिची
कैक योद्धे....गार पडले आमचे

भेटली असती सुखाची सावली
पण उन्हाने ध्येय खचले आमचे

लेखणी तलवार वाटू लागली
शब्द जेव्हा ढाल बनले आमचे

चार खांद्यांची गरज पडली कुठे?
'धड' कुरुक्षेत्रात सडले आमचे

चांगले केलेस तू......हे ईश्वरा
देह मातीचे.....बनवले आमचे

हिंमतीने साथ जेव्हा सोडली
प्राण मृत्यूने पळवले आमचे

राखता आहात काट्यांची निगा
यामुळे तर पुष्प सुकले आमचे

दूर व्हा आम्हा जवळ थांबू नका!
हेच तर ऐकून चुकले आमचे

सतिश गुलाबसिंह मालवे
अमरावती ह. मु. पुणे 
मो. 9527912625

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

९) मुक्त आसवांचा व्हायचा प्रलय नाही

टाळल्यास टळतो जो हा तसा विषय नाही
भावनेस प्रेमाच्या कोणतेच वय नाही

भेटण्यास हृदयाला, तोड बंध देहाचे
त्याशिवाय घडतो जो तो खरा प्रणय नाही

एकदाच संपव जे संपवायचे आहे
तीळ तीळ तुटण्याने व्हायचा विलय नाही

व्यक्त कर स्वतःला अन् मुक्त हो खरोखर तू
आत आत झुरण्याची चांगली सवय नाही

ऐक शांततेचा स्वर केवढा मधुर आहे
शब्द घोकताना ही साधणार लय नाही

राखले कसोशीने भान वास्तवाचे मी
ठेवले स्वतःभवती नाटकी वलय नाही

स्पष्टता जरी नडते, तीच तारते सुद्धा
कोणत्याच कामाचा बेरकी विनय नाही

मोकळीक दे त्यांना संथ वाहण्याची तू
मुक्त आसवांचा मग व्हायचा प्रलय नाही

सरोज चौधरी
पुणे 

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

१०) आनंद वाटतो मी

हासून दुःख पचवत, निर्धास्त राहतो मी
आयुष्य वाट खडतर, बिंधास्त चालतो मी,

गाळून आसवांना रडण्यात, अर्थ नाही
आयुष्य मानवाचे, हसण्यात शोधतो मी,

नाही कधी पळालो मागे तरी सुखाच्या
आयुष्य ना कधीही स्वार्थात जाणतो मी

वादास घ्या मिटवुनी पटवून बोलतो मी
हृदयात प्रेम ठेवा समजून सांगतो मी,

मतभेद आज विसरुन, उमजून घेऊ सारे
जगण्यातली मजा ही, आनंद वाटतो मी

मीना महामुनी
उस्मानाबाद

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

११) सत्यवानाची कहाणी का हवी डोक्यात माझ्या

पावसाची सर अचानक थांबली दारात माझ्या
आठवांची लाट सर सर धावली ह्रदयात माझ्या
 
काल होता..आज आहे..तो उद्याही सोबतीला
सत्यवानाची कहाणी का हवी डोक्यात माझ्या

रोजभेटीचे बहाणे वेगळे शोधायचा तो
नेमका पायात काटा जायचा चौकात माझ्या

खात नाही देव काही द्यायचे का..भोग छप्पन
अन्न द्यावे भूक ज्यांना एव्हढे तत्वात माझ्या
 
दाटते गर्दी खयालांची मनामध्ये अचानक
नेमकी असते कुठे ती लेखणी हातात माझ्या

फारशी मीही कुणाशी बोलते आता कुठे हो
बोलते माझी गझल सुख शोधते मौनात माझ्या

धूर तेथे अग्नि वेदान्तातले हे सूत्र आहे
धूर नाही.. अग्नि का मग राहतो देहात माझ्या

रेखा येळंबकर
पुणे

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

१२) बदलून गेले संदर्भ श्रावणाचे

बदलून पार गेले संदर्भ श्रावणाचे
विद्रूप होत गेले ते रूप पावसाचे

प्रत्येक जण स्वतः ला जर मानतो गुरू तर 
सरते महात्म्य नंतर शिष्यत्व मानण्याचे 

यंत्रासमान पूजा करतो कशास आम्ही
डोक्यात आखताना हर काम दिसभराचे

कर साजरी जयंती नाचून साजरी पण
सुंदर विचार थोडे घेऊ सुधारकाचे  

खोडून 'बाल्य' भाळी 'स्पर्धा' करून गेली
सटवी लिहून गेली हे भाग्य लेकराचे 

शीला टाकळकर
पुणे

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

१३) गुलाबी शहारा ...   
 
ऋतू श्रावणाच्या किती छान धारा 
तनाला मनाला गुलाबी शहारा 

मुजोरी हवा पण तुझ्या सोबतीला 
फुलारून येतो प्रितीचा पिसारा 

मला आस आहे प्रियाच्या मिठीची 
ढळे संयमाचा पुन्हा बांध सारा       

म्हणू प्रीत ही की नशा जीवघेणी 
कसा सापडेना कुठेही उतारा 

असे जीवनाच्या प्रवाहात वाहू
नदी सागराची जशी एक धारा 

डॉ. विजया नवले (झरकर )
पुणे

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
सौजन्य:
सातपुडा मिरर न्यूज
संपादक दत्तात्रय सूर्यवंशी
9423497275
आणि
गझल मंथन साहित्य संस्था
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈