जपानच्या विद्यापीठाकडून उपाधी मिळणारे पहिले भारतीय
सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क
कोयासन / वाकायामा (जपान), ता. २३ : सध्या जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देण्यात येत असल्याची घोषणा आज केली. विशेष म्हणजे कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत.
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारसारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न आदी कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज कोयासन विद्यापीठाला भेट दिली, तेव्हा अधिष्ठाता सोएदा सॅन यांनी ही घोषणा केली. कोया-चो येथील महापौर योशिया हिरानो हे आपल्या मुंबई दौऱ्यात फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करतील. याचवेळी महाराष्ट्र सरकारकडून कोयासन विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाने फडणवीस यांचे विशेष आभार मानत 'लेटर ऑफ ॲप्रिसिएशन' दिले.
वाकायामाच्या गव्हर्नरांसमवेत भेट
दौऱ्यात कोयासन विद्यापीठात जाण्यापूर्वी
पहिली बैठक ही वाकायामा प्रिफिक्चरचे गव्हर्नर शुहेई किशिमोटो यांच्यासमवेत झाली. त्यांनी फडणवीस यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित केले होते. यावेळी कोया- चोचे महापौर योशिया हिरानो, कोयासन विद्यापीठाचे अध्यक्ष सोईडा युषो वाकायामाचे परराष्ट्र व्यवहार संचालक योशियो , यामाशिता आदी उपस्थित होते. जपानमधील भारतीय राजदूत सिबी जॉर्ज यांनी फडणवीस यांच्यासाठी रात्री भोजनाचे आयोजन केले होते.