याबाबत सविस्तर वृत्त असे, चवनाईपाडा ता.अक्कलकुवा येथील तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याने तीने कंटाळून दि. १३ जुलै रोजी आत्महत्या केली होती. याबाबत सुरुवातीला मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मुलीवर बलात्कार झाल्याने तिने जीवन संपविल्याचे तिच्या पालकांनी सांगितल्यानंतर दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मयत तरुणीच्या पालकांनी तिचा मृतदेह खड्डा करुन मिठात पुरुन ठेवला होता. याबाबत दि. १९ जुलै रोजी आ. आमशा पाडवी यांनी याबाबत विधान परिषदेत लक्षवेधी सुचना मांडली. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषीवर कठोर कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानंतर दि. २० जुलै रोजी संशयितांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही पालकांचे समाधान झाले नसल्याने पालकांनी मयत तरुणीच्या मृतदेहाचे जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती.
शहादा येथील अतिरिक्त जिल्हा, तसेच सत्र न्यायाधीश सी. ए. दातीर यांनी २१ ऑगस्टला पीडित तरुणीचा पुरलेला मृतदेह काढून त्याचे पुन्हा मुंबई येथील जे. जे. रुग्णालयातील विशेष वैद्यकीय पथकामार्फत विच्छेदन करण्याचे आदेश दिले. त्या
नुसार मंगळवार दि २२ रोजी सकाळी दहा वाजता घटनास्थळी अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पार करून दुपारी बारा वाजता मृतदेह काढण्यासाठी खोदकाम सुरू झाले. तीनच्या सुमारास मृतदेह बाहेर काढून तहसीलदार रामजी राठोड यांनी पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुन्हा प्लास्टिक पिशवीच्या आवरणात सीलबंद करून सायंकाळी सहाच्या सुमारास शव शवाहिनीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाला. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत, सहाय्यक निरीक्षक राजेश गावित यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या कार्यवाहीदरम्यान पथकाव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही.यावेळी पोलीस बंदोबस्तात लावण्यात आला होता.