नंदुरबार दि २४(प्रतिनिधी) दुर्गम-अतिदुर्गम भागात काम करूनही बदली झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त न केल्याने महासंघाने ३० ऑगस्ट पासून आंदोलन करण्याच्या इशारा दिला असल्याचे आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष हर्षल मराठे यांनी सांगितले.
जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना डोंगराळ व दुर्गम-अतिदुर्गम भागात ७ ते ८ वर्ष काम करूनही माहे मे २०२३ मध्ये बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदली आदेशात "भरतीने उमेदवार हजर झाल्यावर कार्यमुक्त करावे" अशी जाचक व अन्यायकारक अट टाकून बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी तीन महिन्याचा काळ लोटूनही बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त न केल्याने महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देऊन व प्रत्यक्ष भेटूनही आश्वासनांच्या पलीकडे काही कार्यवाही झालेली नाही. याउलट दरम्यानच्या काळात काही आरोग्य कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी त्वरित कार्यमुक्त करावे या मागणीसाठी आरोग्य कर्मचारी दिनांक ३० ऑगस्ट २०२३ पासून जिल्हा परिषदेच्या समोर बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन करणार असल्याची नोटीस जि.प.प्रशासनाला बजावण्यात आली आहे. याप्रसंगी प्रकाश मराठे, वंदना वळवी, यशोदा वळवी, शिला कोकणी, शिवराम पाडवी, श्रीराम सूर्यवंशी उपस्थित होते.
आंदोलनात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाचे कार्याध्यक्ष योगेश्वरानंद गिरी व चिटणीस सतीश जाधव यांनी केले.