• आजची गझल • (भाग ५४ )
🌹सैराट बदलल्यानंतर🌹
बदलुन जाते दिशा युगाची वाट बदलल्यानंतर
ओळख होते नव्या जगाची थाट बदलल्यानंतर
उगीच अर्ध्यावर अपुला का डाव सोडतो आपण
मनासारखे घडुही शकते लाट बदलल्यानंतर
आयुष्याचा प्रवास खडतर सांगत असती सारे
चढल्यानंतर उतार मिळतो घाट बदलल्यानंतर
निद्रेसाठी औषधगोळ्या, व्यसने... उगाच सारे
झोप सुखाची येवू शकते खाट बदलल्यानंतर
किती आंधळे प्रवाह करती मारा मेंदूवरती
घडेल क्रांती फक्त विषारी पाट बदलल्यानंतर
तेच विषय अन् तेच चेहरे, त्याच त्याच वार्ताही
जगही बदलू शकेल घरचा भाट बदलल्यानंतर
वाट पाहतो उगाच आपण देश नवा घडण्याची
घडेलही पण वर्तन हे सैराट बदलल्यानंतर
दिलीप सीताराम पाटील
राजुरा
मो. 8390893961
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806