बिरसा फायटर्सचा सुतगिरणी कामगारांच्या संपास जाहीर पाठिंबा!
शहादा दि २५ (प्रतिनिधी) सुतगिरणी कामगारांनी सुरू केलेल्या बेमुदत संपाला बिरसा फायटर्स संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे व सुतगिरणीचे एमडी राजाराम दुल्लभ पाटील यांनी संपाचे बॅनर फाडून कामगारास मारहाण केली,या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.पाठिंबा पत्र सुतगिरणीचे युनियन अध्यक्ष जगन निकुंभ व शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,राज्य सदस्य अशोक वळवी,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा, प्रभूदत्तनगर गाव शाखा सदस्य निकेश पावरा ,महिला प्रतिनिधी वसंतीबाई पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते.संपास पाठिंबा मिळाल्याबद्दल सुतगिरणी युनियन उपाध्यक्ष रामदास पाटील यांनी बिरसा फायटर्सचे आभार मानले.
पत्रात म्हटले आहे की, दिनांक २२/०८/२०२३ पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुतगिरणीतील कामगारांनी बेमुदत संप सुरू केला आहे.त्यामुळे सुतगिरणी बंद अवस्थेत आहे. सन २०१७ पासून आजपर्यंत थकित असलेला ५-६ वर्षांचा पिएफ आम्हाला मिळावा,मागील वर्षांचा व या वर्षीचा बोनस मिळावा,दवाखाना बंद आहे तो सुरू करावा,कॅन्टीन बंद आहे ते सुरू करावे,पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करीत आहेत.या संपास आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत.
दिनांक २४/०८/२०२३ रोजी सुतगिरणीचे एमडी राजाराम दुल्लभ पाटील यांनी बेमुदत संपाचे बॅनर फाडून कामगारास मारहाण केली,या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.सुतगिरणी कामगारांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच असून आम्ही सुतगिरणी युनियनचे पदाधिकारी एमडीशी दिवसभर चर्चा करीत आहोत,आमच्या मागण्या मान्य झाल्यानंतरच हा संप आम्ही उठवणार आहोत,अशी प्रतिक्रिया सुतगिरणी युनियनचे सदस्य दिलीप सोनवणे यांनी दिली आहे. आम्ही सुतगिरणीचे युनिट १ मध्ये काम करत होतो,नवीन युनिट २ सुरू झाल्यानंतर एमडी राजाराम पाटील यांनी आम्हा ३० कामगारांना कामावरून काढून टाकले.आता आम्ही नाईलाजाने मंगल कार्यालयात २०० रूपये रोजवर कामाला जातो.अशी प्रतिक्रिया कामगार संजय रामदास चौधरी यांनी दिली.सुतगिरणीचे झाड तोडून विकली जात आहेत,आतील वस्तू भंगाराच्या भावात देण्यात येत आहेत,सुतगिरणी नाहिशी करत आहेत, आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही येथून उठणार नाहीत व एमडी राजाराम दुल्लभ पाटील यांनाही जावू देणार नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया श्री.पटेल यांनी व्यक्त केली.