🌹श्रावण गझलोत्सव🌹
(भाग ४)
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
•अंकाचे मानकरी•
१) वैशाली माळी
२) अलका देशमुख
३) मानसी जोशी
४) संध्या भोजने
५) दिपाली सुशांत
६) ज्योती शिंदे
७) सुजाता मराठे
८) स्वाती भद्रे आकुसकर
९) निशा चौसाळकर
१०) अर्चना मुरुगकर
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
१) तुझा मी मागणे श्रावण..
तुझा मी मागणे श्रावण मला नाहीच परवडले
सरींना सावराया मग बिचारे ऊन धडपडले
अरे! हा पिंजरासुद्धा मला तितकाच आवडतो
नभाला सांगताना का जिवाचे पंख फडफडले
ऋतूंची साथ नव्हती तर भरडुनी खायचे होते
भुकेली लेकरे पाहुन, बियाणे आत तडफडले
कला ही प्रेम करण्याची मलाही ज्ञात आहे, पण
विजेचा हात धरता मी उभे आकाश गडबडले!
उपाशी तर स्वतः होते नशीबाचे रिते भांडे..
अधाशी भूक इच्छेची,तिनेही तेच खरवडले
असे कौतुक, अशा टाळ्या पुढे येतील मार्गी, पण
"नको थांबू नको थांबू" कुणीतर आत बडबडले
वैशाली माळी
पुणे
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
२) नाहला श्रावण उरी
तुझ्या डोळ्यातला चोरून छोटा मेघ नेताना
मला दिसला तुझा श्रावण झुल्यावर वेग घेताना
कधी प्रेमात उन्हाच्या जरा लगडून हिरवळली
अचानक वेल सुकली का अशी बहरून येताना
किती भेगाळली धरणी उन्हाची काहिली झेलुन
सरींतुन नाहला श्रावण उरी भिजवून शेताना
कसाया गाय तू देवून विकली माय दुभत्याची
तुला पोसून विरली ती तिच्या हरसाल वेताना
भले टाकून गेला तू मला नात्यात पिसण्याला
दळाया जीवना जात्यात झगडत तोंड देताना
अलका देशमुख
अमरावती
मो. 8605521327
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
३) पुन्हा
पापणीने रोखले ओघळ पुन्हा
बंद केले आत मी वादळ पुन्हा
भावनेचा हा पसारा रोखला
पण मनाला वेढतो गोंधळ पुन्हा
तोडली नाती नको जी वाटली
बंड करते मन उरे हळहळ पुन्हा
आसवांना आज मी वाहू दिले
होवुनी मन वाहते काजळ पुन्हा
एकटी मी राहते माझ्या घरी
अंतरीची वाढते जळजळ पुन्हा
पावसाची लागली चाहूल अन
झाड पानांची दिसे सळसळ पुन्हा
अंगणी पाऊस वेडा नाचला
पाहता मन जाहले ओहळ पुन्हा
वादळाने एक घरटे पाडले
सुन्न झाले मी सुरू विव्हळ पुन्हा
प्रेम केले माणसांवर मी जरी
का रिती ही राहिली ओंजळ पुन्हा?
सौ. मानसी मोहन जोशी
ठाणे (प.)
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
४) माझ्या तुझ्यात
माझ्या तुझ्यात काही उरले म्हणून बहुदा
वण काळजातले मी जपले स्मरून बहुदा
कानात प्राण आले ओठात शब्द अडले
ढग श्रावणात फुटले डोळे मिटून बहुदा
बोलात पैंजणांच्या तालात नाचतांना
कैफात दुःख भिजले अश्रू नसून बहुदा
मृत्यूस होय म्हणता दारात पाय अडला
थांबू अता कशाला गेले ठरून बहुदा
त्यागात अर्थ असता सौख्यात मी बुडाले
मोक्षात मर्म होते जन्मी मरून बहुदा
संध्या प्रशांत भोजने
नाशिक
8975819819
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
५) श्रावण
सगळ्या ऋतूत हल्ली असतोय रोज श्रावण
ग्रीष्मात मग कळ्यांना भुलतोय रोज श्रावण
आकार घेत आहे नाते तुझे नि माझे
हृदयामध्ये नव्याने फुलतोय रोज श्रावण
झोका अजून झुलतो शेतामधे कधीचा
माहेरच्या स्मृतींनी भिजतोय रोज श्रावण
अव्यक्त भावनांचे आहे मनात ओझे
डोळ्यातुनी तिच्या मग झरतोय रोज श्रावण
विरहामधे मनाला सांभाळले किती मी
जातोय तोल नकळत झुरतोय रोज श्रावण
दिपाली सुशांत
कारंजा (लाड) जि. वाशिम
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
६) माझ्या मनाप्रमाणे
चित्रात रंग भरले माझ्या मनाप्रमाणे
पानाफुलात रमले माझ्या मनाप्रमाणे
बरसून आज गेला पाऊस आठवांचा
ओल्या ऋतूत भिजले माझ्या मनाप्रमाणे
सरकून सावल्या त्या गेल्या कुठे कळेना
आयुष्य हे बदलले माझ्या मनाप्रमाणे
कोणी न सोबतीला येणार शेवटाला
मी एकटीच फुलले माझ्या मनाप्रमाणे
गझले तुझ्याचसाठी आयुष्य वेचले मी
शब्दांत या मिसळले माझ्या मनाप्रमाणे
अस्तास सूर्य जाता अंधारल्या दिशाही
ज्योतीसवे उजळले माझ्या मनाप्रमाणे
सौ. ज्योती. प. शिंदे
रोहा - रायगड
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
७) लुटायला ये तू
सडा शिंपला चांदण देही बघायला ये तू
माझ्यामध्ये तुझेच स्थावर रहायला ये तू
मत्त मोगरा डोलत आहे वाऱ्यासोबत जो
वाट पाहुनी दमण्याआधी झुलायला ये तू
सुकून जाते आहे जीवन विचार करताना
होऊन पुन्हा मूल स्वछंदी फुलायला ये तू
आभाळासह फिरतो आहे चंद्र कोवळा बघ
हात घेउनी माझा हाती रमायला ये तू
ओठांवरती लाखो माणिक केसांत हिरे जे
कुणी लुटारू लुटण्यापूर्वी लुटायला ये तू
सोपे नाही भाव मांडणे हृदयातले सख्या
कोरी कविता डोळ्यांमधली पहायला ये तू
तुझ्याचसाठी मैफिल मीही रंगवली आहे
इत्र स्वरांचे देऊन तुझे डुलायला ये तू
डॉ. सुजाता मराठे
मुंबई
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
८) पावसाची सर
क्षणामध्ये हजारो मैल ओलांडून येते
कुणाची आठवण जेव्हा मनापासून येते
धरेला साज चढतो श्रावणामध्ये असा की
कुणी तो-यात गच्चीवर जशी न्हाऊन येते
कशी द्यावी सजा शाळेत येण्याची उशीरा
घरी उरकून कामे खूप ती लांबून येते
रिकामे ठेवते नेते कधी वाहून मडके
अवेळी पावसाची सर अशी धावून येते
पुन्हा आवेग येतो भावनांना जीवघेणा
तुझ्या गल्लीत हल्ली खूप सांभाळून येते
जरा सांभाळ आयुष्या नको तू धीर सोडू
सुखाची सावली नक्की उन्हा मागून येते
कुण्याही मैफिलीने दूर जाता जात नाही
मनाला एकटेपण जे तुझ्या वाचून येते
डॉ स्वाती भद्रे आकुसकर
नांदेड
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
९) विश्वास ढगांवर ठेवून बघूया
विश्वास ढगांवरही, ठेवून बघूया का
मातीत जरासे बी, पेरून बघूया का
वाढेल मनामध्ये, उद्वेग विनाकारण
शब्दात मृदूतेला, आणून बघूया का
संकोच नको तितका, आहे अजुनी बाकी
टाळून जगाला चल, नाचून बघूया का?
मारून मनाला का, जगतोय जबरदस्ती .
विसरून समाजाला, वागून बघूया का
चाणाक्ष जरा व्हाया, या धूर्त जगामध्ये...
गोष्टीस बिरबलाच्या वाचून बघूया का
हातात तुझ्या माझ्या, उरले न जरी नाही
देवास नवस आता, बोलून बघूया का
नि:स्वार्थ स्वभावाने, पडते न कमी काही
स्वार्थास उरामधल्या, गाळून बघूया का
शेतात तणाचा का, सांभाळ करावा मी
सौख्यास अडवणारे, जाळून बघूया का
नात्यात दुराव्याचा, शिरकाव किती झाला
पाऊल जरा मागे, घेऊन बघूया का
निशा चौसाळकर
अंबाजोगाई
मो.क्र.: 7798095711
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
१०) श्रावण हिरवा वयात असतो
कढ दु:खाचा बापाच्याही घशात असतो
काटा सलता त्याच्यासुद्धा मनात असतो
झोपडीतही झरा सुखाचा वहात असतो
तृप्त सखीचा वसंत जेव्हा घरात असतो
वसंत येतो तसा शिशिरही जगात असतो
सदा कुणी का आंब्याखाली सुखात असतो
नकोच आता पुन्हा जगाशी नवीन नाते
घाव वाहता विखार त्याचा मनात असतो
भीष्म शरावर कुणी द्रौपदी तहात असते
जगणाराही आयुष्याच्या वगात असतो
तिला पाहुनी कळीच खुलते शीळ घालतो
कलपाखाली श्रावण हिरवा वयात असतो
सर्कशीतला वाघ भयाने दबकत चाले
शिकलेला पण सम्राटांच्या खिशात असतो
सौ. अर्चना मुरुगकर
तळेगाव दाभाडे
पुणे
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
सौजन्य
सातपुडा मिरर न्यूज
आणि
गझल मंथन साहित्य संस्था
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈