• आजची गझल • (भाग ५० )
🌹देशभक्ती🌹
सोई नुसार येते अंगात देशभक्ती
आहे इथे कुणाच्या रक्तात देशभक्ती
सव्वीस पंधराव्या हमखास तारखेला
उघडी पडून असते चौकात देशभक्ती
नादात भामट्यांच्या पडुनी गुलाम झाली
फोटोत कैद आणिक नावात देशभक्ती
वाढून भाव आहे, पोटातल्या भुकेचे
करणार कोण सांगा फुकटात देशभक्ती !
सर्रास होत आहे वापर तिचा अघोरी
म्हणुनी उदास आहे देशात देशभक्ती
मारून भावनांना करतात राजकारण
त्यांच्या मुळेच आली धोक्यात देशभक्ती
जीवंत माणसांच्या गर्दीत राहणाऱ्या
शिल्लक अजून आहे पुतळ्यात देशभक्ती
मी भारतीय म्हणुनी ठेवा निदान थोडी
राखून खोल हृदयी श्वासात देशभक्ती
सुनिल बावणे
बल्लारपूर, चंद्रपूर
मो. 8308334123
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक
भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=