(प्रा. डी सी पाटील)
शहादा, ता. 24: तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले असून बाजारात बियाणे देखील उपलब्ध होत असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यातील शेतकऱ्यांकडून 'राशी'सह विविध बीटी कापसाच्या बियाण्यांची मागणी आहे. मात्र, या बियाण्यांची कृत्रिम टंचाई दाखवून, 864 रुपयांच्या बियाण्यांची तब्बल 1200 ते 1500 रुपयांमध्ये विक्री होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. कृषी विभागही बघ्याची भूमिका घेतांना दिसत आहे. सदरची विक्री कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे शेतकरी पुत्र असलेले विक्रेते शेतकऱ्यांची लुट करीत असल्याचे दिसत आहेत.
शहादा तालुक्यात
अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व बागायती कापूस लागवडीची लगबग सुरु आहे, तर काहींनी लावगड देखील केली आहे. जिल्ह्यातील शेतकरी बीटी कापूस लागवडीसाठी दरवर्षाप्रमाणे 'राशी'सह विविध बियाण्यांना पसंती देतात. कृषी विभागाकडून तालुक्यात अपेक्षित कृषी क्षेत्र लक्षात घेवून बियाण्यांच्या पाकिटांची उपलब्धता करुन देण्याचे नियोजन केले असले तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना राशीसह अन्य कापसाचे बियाणे मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. तर ज्या ठिकाणी हे बियाणे मिळत आहे त्या ठिकाणी मात्र, अव्वाच्या सव्वा म्हणजे 864चे पाकीट 1200 ते 1500च्या भावात ते खरेदी करावे लागत आहे.
तालुक्यात बियाण्यांचे बारा वितरक असून 175 ते 200 किरकोळ विक्रेते आहेत. वितरकांना आतापर्यंत सुमारे 15 हजार बियाण्याची पाकिटे उपलब्ध झाली आहेत. या थोक विक्रेत्यांपैकी काहींनी किरकोळ विक्रेत्यांशी मिलीभगत करीत बियाण्यांची कृत्रिम टंचाई करीत 864 रुपयाचे एमआरपी असलेले पाकीट 1200 ते 1500 हजारात विक्री करीत आहेत. तसेच वाढीव दराच्या विक्री पावत्यासुद्धा दिल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत.
शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या बीटी कापूस बियाणाच्या विविध कंपन्यांच्या विशिष्ठ वाणांची अजित सीडसचे, रासी सीड्स, तुलसी सीड्स, नाथ बायोजीन्स, न्युझीविडू सीड्स, एसीयन सीड्स, क्रिस्टल सीड्स, सीडववर्क्स इंटरनॅशनल, महिको, अंकुर सीड्स, कावेरी सीड्स कंपनीचा यांचा समावेश आहे.
ज्या ठिकाणी कमाल किमतीपेक्षा जादा दराने विक्री झाल्याचा संशय आहे, अशा दुकानातून विक्री झालेल्या शेतकऱ्यांची नावे घेऊन त्या शेतकऱ्यांना कृषि सहाय्यका मार्फत संपर्क साधून त्यांना कोणत्या दराने बियाणे मिळाले याबाबत जाब जबाब घेण्यात येवून अश्या जादा दराने बियाण्यांची विक्री केलेल्या कृषि सेवा केंद्रावर महाराष्ट्र कापूस बियाणे (पुरवठा, वितरण, विक्री व विक्रीच्या किमंतीचे निश्चिती करण्याचे विनियमन) अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी व याबाबतीत कंपन्याचा सहभाग आढळून आल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीत कंपनी विरुध्द कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव आयुक्तालयास तात्काळ सादर करण्याची आवश्यकता आहे.
शेतकऱ्यांनी सुद्धा एकाच वाणासाठी आग्रह न धरता त्याच प्रतीच्या अन्य बियाण्यांची खरेदी करणे तसेच ब्लॅक ने बियाणे खरेदी न करता त्या कंपनीवर बहिष्कार टाकला तर पुढच्या वर्षी अशी लूट करण्याचे धारिष्ट्य कोणीही करणार नाही. अशा वाणांच्या कापूस बियाणे विक्री करीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्फत संबंधित कृषिसेवा केंद्रांवर संबंधित सज्जातील कृषि सहाय्यकाची नेमणूक करण्यात येवून त्यांचे निगराणीखाली सदर वाणांची विक्रीची अपेक्षा आहे.