- प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर
नंदुरबार दि २० (प्रतिनिधी) "मराठी रसिकांना सुरेश भटांमुळे गझल कळली!" असे विचार गझल अभ्यासक प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी चिंचवड येथे मांडले. रेणुका गझल मंच प्रतिष्ठान आयोजित दुसर्या राज्यस्तरीय गझल संमेलनाचे उद्घाटन करताना सांगोलेकर बोलत होते.
संमेलनाध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने, ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, प्रा. डॉ. शैलेंद्र भणगे, रेणुका गझल मंच प्रतिष्ठानचे संस्थापक - अध्यक्ष प्रा. डॉ. रे. भ. भारस्वाडकर, संयोजन समिती अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटोळे, समिती सचिव आत्माराम कदम यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर पुढे म्हणाले की, "समकालीन कवींचा विरोध पत्करून माधव ज्युलियन यांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत आणला. सुरेश भट यांनी नि:स्वार्थपणे मराठी गझलेचे ज्ञान असंख्य नवोदितांना दिले. कार्यशाळांच्या माध्यमातून भीमराव पांचाळे यांनी गझलेचा प्रसार केला. हाच वसा रेणुका गझल मंच प्रतिष्ठानने जोपासावा!" असे आवाहन केले. सांगोलेकर यांनी
"झटकू आता सारी मरगळ
चला उभारू नवीन चळवळ"
ही गझल सादर केली. म. भा. चव्हाण यांनी, "गझल ही जागतिक आहे!" असे मत व्यक्त करून,
"मागणी आहे नभात तारकांची
वाढवा उंची स्वतःच्या अक्षरांची"
ही गझल सादर केली. डॉ. प्रशांत पाटोळे यांनी, "चिंचवडच्या पावन भूमीवर रेणुका गझल मंच प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय गझल संमेलन होत आहे ही आनंदाची बाब आहे. मराठी गझलेचा प्रचार, प्रसार अन् सन्मान हे प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे!" अशी माहिती दिली.
प्रा. डॉ. रे. भ. भारस्वाडकर यांनी प्रास्ताविकातून दोन वर्षांपूर्वी रेणुका गझल मंचाची स्थापना झाली. संभाजीनगर येथे पहिले राज्यस्तरीय गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते, असे सांगून आगामी सात वर्षांत पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी गझल संमेलन आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला. डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, "निर्जीव शब्दांचा सांगाडा म्हणजे गझल नव्हे; तर तंत्रशुद्ध मराठी गझल लिहिणे ही एक कला आहे. गझलकार हा मुळात प्रतिभासंपन्न कवी हवा. 'गज्जल' किंवा 'गझल' या वादात पडण्यापेक्षा आपली गझलनिर्मिती बावनकशी व्हावी, हा ध्यास कवींनी घ्यावा!" असे आवाहन केले. त्यानंतर डॉ. मिन्ने यांनी,
"वेळ दिलेली पाळणे सोपे नसते
पंढरपूरला जाणे सोपे नसते"
हा शेर उद्धृत करीत,
"बोलतो मराठी, वाचतो मराठी
हीच माय माझी मानतो मराठी"
ही गझल सादर केली.
उद्घाटन सत्रानंतर तीन मराठी गझल मुशायर्यांमधून सुमारे पस्तीस गझलकारांनी सहभागी होत वैविध्यपूर्ण गझलरचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. अनुक्रमे सिराज शिकलगार, गौतम सूर्यवंशी, बबन धुमाळ यांनी
मुशायर्यांचे अध्यक्षस्थान भूषविले; तर प्रा. डॉ. लक्ष्मण शिवणेकर, रघुनाथ पाटील, म. भा. चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. अनुक्रमे डॉ. प्रशांत पाटोळे, डॉ. रेखा देशमुख - पटवर्धन, अंजली दीक्षित - पंडित यांनी निवेदन केले. प्रशांत आडे यांनी सूत्रसंचालन केले. आत्माराम कदम यांनी आभार मानले.