शहादा दि २६ (प्रतिनिधी) भाव, भक्ती आणि भक्त या तिघांसाठी भगवंत धावत येतो. भारतात हे तिन्हीचा वास असल्याने भगवंताने भारतात अवतार घेतला. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासह वाढत्या तापमानाला रोखण्यासाठी सर्वांनी वृक्ष लागवडीवर भर द्यावा, असे मौलिक विचार भगवताचार्य वेदमूर्ती अविनाशदादा जोशी (नंदुरबारकर) यांनी व्यक्त केले.
शहाद्यातील डोंगरगाव रोडवरील शांतीविहार नगर येथे श्रीमद् भागवत ज्ञानकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कथेचे निरूपण भगवताचार्य वेदमूर्ती अविनाशजी जोशी यांनी केले त्यावेळी त्यांनी उपस्थित भविकांसमोर भाविक, भगवंत आणि देश प्रेमाचे अनेक विचार मांडलेत. काशिनाथ छगन पाटील यांच्या कडे झालेल्या या भागवत कथा प्रसंगी कलश यात्रा, कृष्ण जन्म, पुर्णाहुती, महाप्रसादाचे वाटप आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दुपारच्या वाढत्या तापमानात सुद्धा भाविकांनी हरी कथेचा लाभ घेण्यासाठी गर्दी केली होती.
हरी कथेचे निरूपण करतांना भागवताचार्य अविनाशदादा जोशी म्हणाले की, जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी चे उत्तम साधन म्हणजे हरि कथा. जीवनाच्या व्यथा तीन प्रकारच्या आहेत. कायीक व्यथा, वाचीक व्यथा आणि मानसिक व्यथा. शारीरिक व्याधी या कायेच्या व्यथा, अपशब्द आणि निंदा या वाचेच्या व्यथा तर भूतकाळाचा पश्चात्ताप व भविष्यातील चिंता या मानसिक व्यथा हरि कथा आहेत. त्या हरी कथा श्रवणाने दूर करता येतात. चैतन्य व आनंद या दोन्ही सत्यावर आधारित 'राम' आहे. भगवंत परमात्मा हे सत्य आहे. संत, ग्रंथ, भक्ती पंथ यातून भगवंताचा परिचय व्यक्त करतो येतो. भागवत कथा त्रिवेणी संगम आहे. ज्याचे कामावर प्रेम त्यांचेवर रामाचे प्रेम आहे. निर्मल भक्ती भगवंत जाणतो. भक्ती आणि तिचा परिचय करणारे शास्त्र ते भागवत आहे.भाव, भक्ती आणि भक्त या तिघांसाठी भगवंत धावत येतो. भारतात या तिन्हीचा वास असल्याने भगवंताने भारतात अवतार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री. अविनाशदादा म्हणाले की, राम समजणे सोपे आहे, पण कृष्ण समजून घेणे खूप कठीण काम. कथा हे शाश्वत धन आहे. भौतिक धन कितीही कमावले तरी जाताना सुद्धा शेवटी ते नेता येत नाही. भागवत हे मृत्यू मंगल करणारे शास्त्र आहे. सर्वांना अशाश्वत येथेच सोडून जायचे आहे. आपल्यातील धनाचा हव्यास कमी होत नाही. परमार्थ साधनाचे धन, परमेश्वर भक्ती, दान व सत्कर्म हेच शेवटी उपयोगी येते. भविष्यात श्रद्धेचा व्यापार व्हायला नको म्हणून संतांनी त्यावेळी ग्रंथाद्वारे सूचित केले आहे. भगवंताच्या नामस्मरणाने नवचैतन्य प्राप्त होत असते.
सध्याच्या वाढत्या तापमानावर ते म्हणाले की, सर्वत्र वृक्ष कमी झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्रास होत आहे. शासनाला जे करायचे ते करेल. परंतु त्यांची वाट न पाहता प्रत्येकाने आता सुरुवात करायला हवी. आपल्या घराबाहेर, ओपन प्लेस, शेतात झाडांची रोपे लावा आणि वृक्ष संवर्धन करा. त्यात कडू लिंब जास्त असावेत. शेताच्या बांधावर एक तरी झाड लावा व त्याला वाढवा. तर कन्या जन्माबद्दल बोलतांना ते म्हणाले की, सध्या सर्वच समाजातील कन्या जन्मदर कमी आहे. जन्म आधीच तिला खुडतात. मात्र शाश्वत भागवतात ज्यांच्याकडे लेक जन्माला आली ते भाग्यवान आल्याचे सांगितले आहे. यापुढे सर्वांनीच मुलीच्या जन्माचे स्वागत केले पाहिजे. कन्या जन्मामुळे आपल्याला समाजाभिमुख कसे जगावे हे कळते.