Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

वीज ग्राहकांना योग्य बिल पाठविण्यात येणार -कार्य.अभि.अनिल झटकरे कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलन उभारणार-शिष्टमंडळाचा इशारा

वीज ग्राहकांना योग्य बिल पाठविण्यात येणार -कार्य.अभि.अनिल झटकरे

कारभारात सुधारणा न झाल्यास आंदोलन उभारणार-शिष्टमंडळाचा इशारा 

 शहादा, दि  २८ (प्रतिनिधी) वीज वितरण कंपनीच्या शहादा शहर व तालुक्यातील ग्राहकांच्या वीज बिलासह अन्य समस्या येत्या पंधरा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता अनिल झटकरे यांनी वीज ग्राहकांच्या शिष्ट मंडळास दिले आहे.तर येत्या महिन्याभरात वीज वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा न झाल्यास कायदेशीर आंदोलन उभारण्याच्या इशारा माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर व सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिला आहे. 
     शहादा शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांना गत तीन महिन्यापासून डिजिटल वीज मीटरद्वारे वीज बिल दिले जात आहे. मात्र अनेक ग्राहकांना रीडिंग उपलब्ध नाही असा शेरा मारून सरासरी वीज बिल दिले जात आहे. काही ग्राहकांना वीज बिल वेळेवर न भरल्याचे कारण सांगून कनेक्शन कट करण्याची भीती दाखविली जात आहे.कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने घरगुती उपकरणांचे होणारे नुकसान, शहरीसह ग्रामीण भागातील डीपीवर दाब नियंत्रक यंत्र बसविण्यातील चालढकल,व्यावसायिक ग्राहकांना सरासरी वीज बिल आकारणी, वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकारही वाढ झाली असून विविध करांच्या नावाखाली तसेच सुरक्षा अनामत रकमेच्या नावाने भरमसाठ वीज बिल पाठविले जात आहे.याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सोमवार दि.27 रोजी माजी उपनगराध्यक्ष अरविंद कुवर, सामाजिक कार्यकर्ते अनिल भामरे, विजय चौधरी, पत्रकार प्रा.नेत्रदीपक कुवर, रुपेश जाधव व शहरातील तक्रारदार ग्राहकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.यावेळी कार्यकारी अभियंता अनिल झटकरे, उपकार्यकारी अभियंता भूषण जगताप,सहाय्यक अभियंता किशोर गिरासे,प्रभारी उपव्यवस्थापक वित्त व लेखा संदीप ठाकूर आदींची उपस्थिती होती.
    यावेळी माहिती देतांना श्री. झटकरे म्हणाले की, शहादा शहरात सुमारे 19 हजार वीज ग्राहक असून शहादा एक अंतर्गत सोळा हजार तर दोन अंतर्गत दहा हजार ग्राहक आहेत.शहरात आरएफ मीटर (रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर) बसविण्यात आले असून एजन्सी मार्फत डिजिटल रीडिंग घेतले जाते. संबंधित एजन्सीकडून रीडिंग बाबत अनियमतता होत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे ही वस्तुस्थिती आहे .ग्राहकांच्या तक्रारींची कंपनीकडून दखल घेण्यात आली असून येत्या पंधरा दिवसात रीडिंगसह वीज वितरण कंपनीच्या बाबतीत असलेल्या तक्रारी निकाली काढण्यात येतील. ग्राहकांनी वीज वितरण कंपनीस सहकार्य करण्याचे आवाहन श्री. झटकरे यांनी केले आहे.यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना ग्राहक प्रतिनिधी म्हणून श्री.कुवर व श्री.भामरे यांनी म्हटले आहे की, शहादा वीज वितरण कंपनीने वीज बिलासह ग्राहकांचे हित लक्षात घेऊन कारभारात सुधारणा करावी. येत्या महिन्याभरात ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या सोडविण्यात याव्यात.अन्यथा तीव्र कायदेशीर आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.