नंदुरबार (प्रतिनिधी) वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे थोर संतश्री बालब्रम्हचारी सिदाजीआप्पा देवर्षी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त महाआरती करण्यात आली.
बालवीर चौक, महात्मा बसवेश्वर नगर येथे महाराष्ट्र बसव परिषद, शहीद शिरीषकुमार मित्र मंडळ आणि नंदुरबार गवळी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने थोर संतश्री बालब्रम्हचारी सिदाजीआप्पा देवर्षी महाराज यांच्या 57 व्या पुण्यतिथी निमित्त महाआरती करून प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले.
सेवानिवृत्त शिक्षक जी.एस. गवळी व सौ. विमलबाई गवळी यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करून महा आरती करण्यात आली. याप्रसंगी प्रतिमेस पंचामृताने अभिषेक करण्यात आला. महाराष्ट्र बसव परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी सांगितले की, कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात चिटगुप्पा गावात बालब्रम्हचारी सिदाजीआप्पा उर्फ महादूआप्पा देवर्षी यांचे भव्य मठ व मंदिर आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात महाराष्ट्रा सह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, तेलंगणा राज्यातील गवळी समाज बांधव वार्षिक उत्सवानिमित्त चीटगुप्पा येथे एकत्र येतात. दि. 20 मे 1967 रोजी बालब्रम्हचारी सिदाजीआप्पा देवर्षी यांचे देहावसन झाले. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
परमपूज्य सिदाजीआप्पा देवर्षी यांचे चांगभले... या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शंखनाद करीत उपस्थित समाज बांधवांना कपाळावर भस्म (इबीत ) लावण्यात आला. अभिवादन कार्यक्रमास नंदुरबार नगर पालिकेचे नाट्यमंदिर येथील कर्मचारी पांडुरंग यादबोले, राजेंद्र शहापूरकर, संभाजी हिरणवाळे, सदाशिव गवळी,
सुदाम गवळी, विशाल हिरणवाळे,अमर हिरणवाळे, धीरेन गवळी, कमल गवळी, नंदा हिरणवाळे,सुनिता हिरणवाळे, दिपाली हिरणवाळे,पूजा हिरणवाळे, सारिका उदीकर (जळगाव), नूतन गोडळकर ( शिरपूर), भाग्यश्री हिरणवाळे, लीना हिरणवाळे, अनुष्का उदीकर, समृद्धी उदीकर, देवांश गोडळकर,मल्हार हिरणवाळे, आदींसह समाज बांधव उपस्थित होते.
सिदाजी आप्पा देवर्षी नगर नामकरण
शासनातर्फे राज्यातील सर्व शहरांमधील जातिवाचक वस्त्यांची नावे बदलण्यात आली. यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदुरबार दौऱ्यावर असताना पत्रकार महादू हिरणवाळे यांनी त्यांची भेट घेऊन यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानुसार गवळीवाडा भागाचे नाव संतश्री सिदाजीआप्पा देवर्षी नगर तसेच नवा भोईवाडा, देसाईपुरा भागाला महात्मा बसवेश्वर नगर नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून केली होती. महादु हिरणवाळे यांच्या मागणीला यश आले असून आता सर्व ठिकाणी गवळीवाड्याचे संतश्री सिदाजी आप्पा देवर्षी नगर नामकरण झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. याबद्दल नंदुरबार गवळी समाजातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि समाज कल्याण विभागाचे आभार मानण्यात आले आहे.
गवळीवाड्यात महाप्रसाद वाटप...
नंदुरबार शहरातील गवळीवाडा नंदेश्वर चौकात याच वर्षी एक जानेवारी रोजी बालब्रह्मचारी परमपूज्य सिदाजीआप्पा देवर्षी यांचे मंदिर उभारण्यात आले आहे. राजस्थान येथून संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. वीस मे रोजी सायंकाळी 57 व्या पुण्यतिथी निमित्त आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले. यजमान पांडुरंग यादबोले, अशोक यादबोले यांच्यातर्फे महाप्रसाद वितरण करण्यात आले. याप्रसंगी गवळी समाज बांधव महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.