संमेलनाध्यक्षपदी निलेश कवडे तर प्रमोद खराडे स्वागताध्यक्ष
नंदुरबार, दि. १५ गझल मंथन साहित्य संस्थेचे उद्या दि. १६ जून रोजी पुणे येथे विभागीय गझल संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी नामांकित गझलकार निलेश कवडे यांची निवड करण्यात आली आहे. तर ज्येष्ठ गझलकार प्रमोद खराडे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.
संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ गझलकार डॉ. कैलास गायकवाड यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गझलकार डॉ. शिवाजी काळे व गझलकारा डॉ. स्नेहल कुलकर्णी उपस्थित राहतील. साहित्य जगतातील अग्रगण्य संस्था गझल मंथन साहित्य संस्था महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात विभागीय गझल संमेलन आयोजित करीत आहे. पुणे विभागाचे गझल संमेलन हे उद्या दि. १६ जून रोजी सकाळी ९ वाजता पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात होत आहे.
या संमेलनानिमित्त दिवसभर गझल मुशायरे रंगणार आहेत. या गझल मुशायऱ्यांचे अध्यक्षपद डॉ. कैलास गायकवाड, सुनीति लिमये, संदीप जाधव, अभिजीत काळे, प्राजक्ता पटवर्धन, प्रशांत पोरे आणि बा. ह. मगदूम भूषवतील. तर मुशायऱ्यांचे सूत्रसंचालन दिनेश भोसले, यशश्री रहाळकर, डॉ. रेखा देशमुख, सुप्रिया हळबे, डॉ. मंदार खरे, रेखा कुलकर्णी व प्रदीप तळेकर करणार आहेत. या संमेलनाचा गझल रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेच्या पुणे जिल्हा कार्यकारिणी व पुणे विभागीय कार्यकारिणीने केले आहे.