Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा- 2 अभियानात सहभागी व्हावे!सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांचा सहभाग आवश्यक

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा- 2 अभियानात सहभागी व्हावे!सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या शाळांचा सहभाग आवश्यक
नंदुरबार दि २(प्रतिनिधी) शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत " मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा " हे अनोखे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. या अभियानातील काही उपक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही झाली. या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रक्कमेच्या स्वरुपात पारितोषिक देण्यात आली. आता २०२४-२५ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा दुसरा टप्पा काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्यात येणार आहे. 
 राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी " मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा " टप्पा-2 अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात आली आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल.
 विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबरच अध्ययन, अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शासनाच्या ध्येयधोरणांशी सुसंगत शालेय प्रशासनाच्या बळकटीकरणास चालना देणे, शिक्षणासाठी पर्यावरण पूरक व आनंददायी वातावरणाची निर्मिती करणे, शालेय शिक्षणाच्या दृष्टीकोणातून सर्वाधिक महत्वपूर्ण असलेल्या शैक्षणिक संपादणूक आदी घटकांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यात येणार आहे. 
 "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" टप्पा-2 अभियानाच्या पूर्वतयारीसाठी २९ जुलै २०२४ ते ०४ ऑगष्ट २०२४ हा कालावधी निश्चित करण्यात आला असून सर्व शाळांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. ०५ ऑगष्ट,२०२४ ते ४ सप्टेंबर,२०२४ हा अभियानाचा कालावधी आहे. या अभियानाचा कालावधी एक महिना आहे. 
 या अभियानात सहभागी होऊन एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधांसाठी ३३ गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी ७४ गुण, शैक्षणिक संपादणूकसाठी ४३ गुण असे १५० गुणांच्या आधारे सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन करण्यात येणार आहे, अशी माहिती श्रीम. वंदना वळवी शिक्षणाधिकारी (प्राथमिक),श्री.निलेश लोहकरे उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक),श्री.प्रविण अहिरे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व डॉ. युनूस पठाण उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी दिली.