Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

सातशे चार कोटी रूपए खर्चाच्या 902 कामांना दिली मंजूरी, जिल्ह्यातील सुमारे 300 वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावित

सातशे चार कोटी रूपए खर्चाच्या 902 कामांना दिली मंजूरी, जिल्ह्यातील सुमारे 300 वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार :- मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार दि १७(प्रतिनिधी)जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुलभ व्हावे यासाठी 704 कोटी रूपए खर्चाच्या रस्ते, संरक्षक भितं व लहान पूलांच्या एकूण 902 कामांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 300 वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत. यात 300 किलोमीटर रस्ते व 30 लहान, मोठ्या पुलांचा समावेश आहे, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. 
              आज शहरातील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या शुभारंभ व मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या आदेश वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे पालकमंत्री तथा पुनर्वसन व मदत मंत्री अनिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमशा पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, रतन पाडवी अभिजित मोरे, जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी, कृष्णा राठोड (जि.प.), कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
        यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील 06 लाभार्थी महिला भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरीत करण्यात आले, तसेच त्यांनी यावेळी आपल्या बोली भाषेतून मनोगतही व्यक्त केले. त्यात सावित्री सुभाष पाडवी, नंदिता उखाजी वसावे, अरुणा शरद राठोड, पूनम कृष्णा बागुल, उषा सुदाम भिल, अनिता आत्माराम गावित यांचा समावेश होता. 
        आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणात या प्रसंगी पुढे सांगितले की, शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व कुटुंब नजरेसमोर ठेवून योजना तयार केल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना व यासारख्या काही योजना यापूर्वी मध्य प्रदेश आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये राबवल्या गेल्या आहेत. त्यांची फलश्रृती आणि त्यातून सर्वसामान्य माणसाचे झालेले समाधान लक्षात घेवून महाराष्ट्र शासनानेही आता अशा प्रकारच्या योजना हाती घेतल्या आहेत. या सर्व योजना अतिशय विचारपूर्वक सुरू करण्यात आल्या आहेत. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरूणांमध्ये प्रशिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आदिवासी विकास विभागाने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना गाईंचे वितरणाची योजना सुरू केली, ती योजना आता सर्वांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर राबवली जाणार आहे. सर्व सामान्य जनतेच्या डोक्यावर असलेले वीजबिल, रोजगार, पाणी यासारख्या प्रश्नांवर शासनाने प्राथमिकता दिली असून शहरे आणि गावे या सर्वांना बारमाही पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले. सर्वसामान्य जनतेच्या गणिताच्या या योजनांच्या अंमलबजवणीतील गतीमानता बघून त्याचा अपप्रचार केला जातो आहे, अशा अपप्रचार करणाऱ्यांपासून सावध राहून या योजनेचा लाभ सर्वांनी घेणे हेच या अपप्रचाराचे खरे उत्तर असेल.

*2 लाख 61 हजार बहिणींना लाभ*

 “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेत भगिनींच्या खात्यात 14 ऑगस्टपासून पैसे जमा व्हायला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 61 हजार 997 महिला भगिनींच्या खात्यात येत्या 19 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशीपर्यंत जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाचवेळी जमा होणार आहे. या भगिनींना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा” योजनेत वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. येणाऱ्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त 2 लाख 70 हजार 99 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.