Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जर्मनीतील बाडेन - वुटेनबर्ग या राज्यात शासकीय,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील शिक्षकांना जर्मन देशात रोजगाराची संधी - प्रविण चव्हाण, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार

नंदुरबार दि २२(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देणे, याबाबत सामंजस्य करार दिनांक २५/०२/२०२४ रोजी केला आहे. तसेच पुढील कामकाजाची दिशा ठरवण्यासाठी दिनांक ११ जुलै २०२४ नुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्समुलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामध्ये दिनांक ०९/०८/२०२४ रोजी सामंजस्य करार करण्यात आला आहे. 
जर्मनीतील बाडेन - वुटेनबर्ग या राज्यात रोजगारानिमित्त जाण्यास इच्छुक प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाला जर्मन भाषा अवगत असणे अनिवार्य असल्याने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत मोफत जर्मन भाषा प्रशिक्षण जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. दि. ११ जुलै २०२४ रोजीच्या शासननिर्णयानुसार जर्मन देशात रोजगारासाठी इच्छुक असणाऱ्या जिल्ह्यातील पात्र व कुशल युवकांनी https://maa.ac.in/GermanyEmployment/ या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी करावी.
जर्मन भाषा शिकवण्यासाठी राज्यभरात १०,००० विद्यार्थ्यांसाठी ४०० प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे. सदर प्रशिक्षण वर्ग दोन सत्रात असल्याने (सकाळ व संध्याकाळ) असे २०० प्रशिक्षण वर्ग राज्यभरात सुरू करणे प्रस्तावित आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी जर्मन भाषेची अर्हता BA in जर्मन, MA in जर्मन व ग्योथे इन्स्टिट्यूट यांचे द्वारे घेण्यात येणारी स्तरनिहाय A1, A2, B1, B2, C1, C2 उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षकांची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील जर्मन भाषेची आवड असणाऱ्या नियमित शिक्षकांसाठी जर्मन भाषेचे प्रशिक्षण वर्ग शासनामार्फत मोफत सुरू करणे प्रस्तावित असून - शिक्षकांची नाव नोंदणी करण्यासाठी गुगल लिंक https://forms.gie/1Q32ByNwp9MnHmHc7 देण्यात आली आहे. तसेच आवश्यक सूचना व माहिती - https://maa.ac.in/GermanyEmployment/teacher-germany-employement.php या website ला उपलब्ध आहे.
उपरोक्त लिंकवर शिक्षक नावनोंदणी करीत आहेत. तथापि जर्मन भाषा शिकविण्यासाठी मोठ्या संख्येने शिक्षकांची आवश्यकता असल्याने व्यापक लोकहितास्तव नंदुरबार जिल्हा कार्यक्षेत्रातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या इच्छुक शिक्षकांनी उपरोक्त website वरील सूचनांचे अवलोकन करून दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे बाबत आवाहन करण्यात येत आहे. तरी अधिकाधिक शिक्षकांनी या लिंकवर नावनोंदणी करावी.
             जर्मनीतील बाडेन - वुटेनबर्ग या राज्यात जाणाऱ्या कुशल मनुष्यबळाला जर्मन भाषा शिकविण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांतील इच्छुक शिक्षकांना नाव नोंदणी करण्यास तसेच जर्मन देशात रोजगारासाठी इच्छुक असणाऱ्या शासन निर्णयात नमूद पात्रताधारक युवक-युवतींना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन श्री प्रविण चव्हाण, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांनी केले आहे.