Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शाडू मातीचा गणपती बनवूया; पर्यावरणाचे रक्षण करूया - अमोल बागुल मुख्याधिकारी नंदुरबार नगरपरिषद यांचे आवाहन

शाडू  मातीचा गणपती बनवूया; पर्यावरणाचे रक्षण करूया - मुख्याधिकारी यांचे आवाहन

नंदुरबार दि ३०(प्रतिनिधी)‘शाडू मातीचा गणपती बनवूया व पर्यावरणाचे रक्षण करूया’, असे आवाहन करत यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले.

         श्री गणेश कला केंद्र व नंदुरबार नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार शहरातील माळी समाज मंगल कार्यालय येथे आयोजित ‘ईको फ्रेंडली’ गणेशमूर्ती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. श्री गणेशाचे पुजन करून नंदुरबार नगरपालिका कार्यालय अधीक्षक श्री. जयसिंग गावित यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी विवेकानंद शाळेचे मुख्याध्यापक श्री. निंबा माळी सर, नगरपालिका चे राजेश परदेशी, राजेंद्र पाखले, दीपक पाटील, अभियंता हिमांशू परदेशी, शहर समन्वयक  राहुल निकम,श्री गणेश कला केंद्र, नंदुरबार चे संचालक  राहुल मराठे आणि स्वरूप मंगल आर्ट चे मूर्तिकार  अनंत पाटील हे देखिल उपस्थित होते.
तसेच विविध शाळांचे कला शिक्षक उपस्थित होते. 
            गणेशोत्सवात ज्या प्लास्टर ऑफ पॅरिस च्या अवाढव्य गणेश मुर्ति बनविल्या जातात त्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. पर्यावरणपूरक गणेश मुर्तीची स्थापना करण्याचे सांगत, कार्यशाळेत उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या मित्रांनाही ईको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवायला शिकवून पर्यावरण रक्षणाची जनजागृती करण्याचे आवाहन मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल सर यांनी केले.
           गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर श्री गणेश कला केंद्र ने ईकोफ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा उपक्रमाच्या पुढाकार घेतला याबद्दल मुख्याधिकाऱ्यांनी यावेळी कौतुक केले. यावेळी श्री. गणेश कला केंद्र चे संचालक श्री. राहुल मराठे यांनी शाडू मातीपासूनच गणेश मुर्ती का? या विषयावर प्रबोधन केले.
         गणेश उत्सवात दीड, तीन, पाच, सात आणि दहा दिवस श्री गणेशाची आराधना केली जाते आणि त्यानंतर मूर्तीचे स्वागत जसे वाजतगाजत केले जाते तसेच विसर्जनही मिरवणुकीने किंवा बाप्पा मोरया अशा जयघोषातच केले जाते. मात्र, विसर्जनानंतर नगरांमध्ये पीओपी मूर्तीच्या अवशेषांचे जे विदारक स्वरूप समोर आले आहे, ते आपल्या जलस्रोतांसाठी घातक प्रदूषणकारी आहे आणि त्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती संकल्पना पुढे आली आणि आता बहुतेक ठिकाणी रुजत आहे.
         या पर्यावणपूरक श्रीगणेशाच्या मूर्तीसाठी शाडूच्या मातीचा वापर केलेला दिसून येतो. ही माती विशिष्ट प्रकारची करड्या रंगाची असते. सौराष्ट्रातून पोरबंदर, भावनगर या भागातून ही माती आणली जाते. या मातीचे खडक येथील नदीच्या ठिकाणी मुबलक सापडतात. सध्या या मातीचे गोळे गणपती बनवण्यासाठी विकत मिळतात; पण ही माती तयार करण्याची प्रक्रिया वेगळी आहे. गुजरातमधून येणाऱ्या या मातीचे खडक फोडून ते बारीक दळून त्याची पावडर तयार केली जाते. ही माती भिजवल्यावर मुलायम होते. या मातीमध्ये "वॉटर लॅण्डिंग कपॅसिटी' (पाणी धारण करण्याची क्षमता इतर मातीच्या तुलनेत जास्त असते.
         त्याचप्रमाणे "टेन्साइल स्ट्रेन्थ' ही (इतर मातीच्या तुलनेत मातीचे तुकडे पडत नाहीत) मातीमध्ये उत्तम आहे, त्यामुळेच ही माती गणेश मूर्तीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. कागदी लगदा पासुन गणेश मूर्ती देखिल प्रदूषणकारी असुन शाडू माती किंवा स्थानिक काळी- चिकन मातीच्या गणेश मुर्ति बसविण्याच्या संकल्प करूया.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विजयकुमार माळी सर यांनी केले. ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 नंदुरबार शहराच्या प्रत्येक शाळेचे ८-१० विद्यार्थी सहभागी झाले होते आणि विद्यार्थ्यांना ५ पारितोषिक ही देण्यात आले. यात उत्कृष्ट प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रथम सचिन विजय माळी यांच्या ग्रूप, द्वितीय दिपाली लक्ष्मण ठाकरे यांच्या ग्रूप, तृतीय ओम सुखदेव मराठे यांच्या ग्रूप, चतुर्थ प्रिया प्रकाश पाडवी यांच्या ग्रूप,पंचम राशी अनिल भिल यांच्या ग्रूप, उत्तेजनार्थ ची.साहिल गणेश सोनवणे यांची निवड करण्यात आली. परीक्षक म्हणून सिद्धांत माळी, प्रसाद दीक्षित, श्री गणेश कला केंद्र चे राहुल मराठे,  अनंत पाटील, संतोष पाडवी, शशिकांत हजारी यांनी काम पाहिले.
        कार्यशाळेचे प्रशिक्षक स्वरूप मंगल आर्ट चे श्री अनंत पाटील यांनी उपस्थितांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवायला शिकविले. शाडू मातीपासून पर्यावरणपूरक लाडक्या बाप्पांची मूर्ती स्वत:च्या हाताने साकारल्याचा आनंद कार्यशाळेत सहभागी बालगोपालांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
      पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा विद्यार्थ्यांनी घेतला संकल्प!
ईको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थ्यांनी यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याच्या संकल्प घेतला.
     आजच्या हा उपक्रम आपण राबवित आहोत यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास सहकार्य मिळते. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा यासारख्या स्तुत्य उपक्रमाने नक्कीच विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही पर्यावरणासंदर्भात जनजागृती होईल.
-श्री. निंबा मोहन माळी,
मुख्याध्यापक, स्वामी विवेकानंद शाळा, नंदुरबार.


श्री गणेश कला केंद्र,
नंदुरबार.
7775099467